Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
12
सिकलाग येथे दाविदाला साहाय्य करणारे
1 शमु. 22:1-2

1 कीशाचा पुत्र शौल याच्या भीतीने दावीद सिकलागला, लपून राहत असताना त्याच्याकडे आलेली माणसे ही होती. ते त्याच्या सैनिकांपैकी असून लढाईत मदत करणारे होते. 2 धनुष्यबाण चालवणे किंवा गोफणगुंडा मारणे या गोष्टी ते डाव्या व उजव्या दोन्ही हातांनी करीत होते. बन्यामीनच्या वंशात जे शौलाचे नातेवाईक होते.

3 अहीएजर हा त्यांच्यातला प्रमुख होता. मग योवाश, गिबा येथील शमा याचे हे पुत्र त्यानंतर यजिएल आणि पेलेट. हे अजमावेथ याचे पुत्र. अनाथोच येथील बराका व येहू. 4 गिबोन येथील इश्माया हा तीन वीरांपैकी एक आणि त्या तीन वीरांचा प्रमुख. गदेराथ लोकामधून यिर्मया, यहजिएल, योहानान आणि योजाबाद.

5 एलूजय, यरीमोथ, बाल्या, शमऱ्या, हरुफी शफट्या 6 एलकाना, इश्शिया, अजरेल, योबेजर आणि याशबाम हे कोरहाचे वंशज, 7 तसेच यरोहाम गदोरी याचे पुत्र योएला आणि जबद्या.

8 गादी यांच्यातील काही लोक दावीदाकडे तो वाळवंटातील गढीत असताना आले. ते चांगले शूर लढवय्ये होते. ढाल व भालाफेक हाताळणारे होते. त्यांची तोंडे सिंहाच्या तोंडासारखी भयानक होती. ते डोंगरावरील हरणासारखे वेगाने धावणारे होते.

9 गाद वंशातील एजेर हा सैन्याचा प्रमुख होता. ओबद्या दुसरा, अलीयाब तिसरा. 10 मिश्मन्ना चौथा क्रमाकांवर तर यिर्मया पाचव्या वर होता. 11 अत्तय सहावा, अलीएल सातवा, 12 योहानन आठवा, एलजाबाद नववा, 13 यिर्मया दहावा, मखबन्नय अकरावा.

14 हे गादी सैन्यातील सरदार होते. त्यांच्यातला जो लहान तो शंभरावर आणि जो मोठा तो हजारांवर होता. 15 वर्षाच्या पहिल्या महिन्यात यार्देन नदी दुथडी भरून वाहत होती तेव्हा त्यांनी ती ओलांडून जाऊन खोऱ्यात राहणाऱ्यांना त्यांनी पार पूर्वेला आणि पश्चिमेला पळवून लावले.

16 बन्यामीन आणि यहूदा वंशातील लोकही दावीदाला गढीत येऊन मिळाले. 17 दावीदाने त्यांचे स्वागत केले व त्यांना तो म्हणाला, “मला मदत करायला तुम्ही शांतीने आला असाल तर तुम्ही मला सामील होऊ शकता. पण माझ्या हातून काही अपराध झालेला नसताना कपट करायला आला असलात तर आमच्या पूर्वजांचा देव ते पाहून त्याचा निषेध करो.”

18 अमासय याच्यावर आत्मा आला, तो तीस जणांचा प्रमुख होता. तो म्हणाला “दावीदा, आम्ही तुझे आहोत. इशायाच्या मुला, आम्ही तुझ्या बाजूचे आहोत. शांती, तुला शांती असो! तुला मदत करणाऱ्यांनाही शांती असो, कारण तुझा देव तुला मदत करतो.” तेव्हा दावीदाने त्यांना आपल्यात सामावून घेतले आणि त्यांना सैन्याचे अधिकारी केले.

19 मनश्शेचे काहीजणही दावीदाला येऊन मिळाले. तो पलिष्टंयाबरोबर शौलाशी लढायला गेला तेव्हा ते आले. पण त्यांनी पलिष्ट्यांना फारशी मदत केली नाही. कारण पलिष्ट्यांच्या पुढाऱ्यांनी आपसात सल्ला करून त्यांनी दावीदाला परत पाठवून दिले. ते म्हणाले, “दावीद जर आपला धनी शौल याच्याकडे परत गेलाच तर आपल्या जीवाला धोका होईल.” 20 तो जेव्हा सिकलागला गेला. त्याच्याबरोबर आलेले मनश्शेचे लोक अदनाह, योजाबाद, यदीएल, मीखाएल, योजाबाद, अलीहू, आणि सिलथय. हे सर्व मनश्शे वंशातील सरदार होते.

21 लुटारुंच्या टोळीविरुध्द तोंड द्यायला त्यांनी दावीदाला मदत केली. ते लढणारे माणसे होते. दावीदाच्या सैन्यात ते अधिकारपदावर चढले. 22 देवाच्या सैन्यासारखे मोठे सैन्य होईपर्यंत दावीदाच्या मदतीला येणाऱ्यांत दिवसेंदिवस भर पडत गेली.

हेब्रोन येथील दाविदाचे सैन्य
23 आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे हेब्रोन नगरात शौलाचे राज्य दावीदाच्या हाती द्यावे म्हणून सशस्त्र सैनिक त्याच्याकडे आले. 24 यहूदाच्या घराण्यातील सहा हजार आठशे, सैनिक ढाल आणि भाले यांसह लढाईस सशस्त्र होते. 25 शिमोनाच्या कुळातून सात हजार शंभर लढाईस तयार असे शूर सैनिक होते.

26 लेवीच्या कुळातून चार हजार सहाशें शूर वीर होते. 27 अहरोनाच्या घराण्याचा पुढारी यहोयादा होता. त्याच्याबरोबर तीन हजार सातशे लोक होते. 28 सादोक तरुण बलवान आणि धैर्यवान वीर असून त्याच्या वडिलाच्या घराण्यातील बावीस सरदार त्याने बरोबर आणले होते.

29 बन्यामीनच्या वंशातील तीन हजार जण होते. ते शौलाचे नातेवाईक होते. तोपर्यंत ते बहुतेक शौलाच्या घराण्याशी एकनिष्ठ होते. 30 एफ्राइमाच्या घराण्यातील आपल्या वडिलांच्या घराण्यात नावाजलेले असे वीस हजार आठशे शूर सैनिक होते. 31 मनश्शेच्या अर्ध्या वंशातील अठरा हजार लोक दावीदास राजा करण्यास आले. त्यांची नावे नोंदण्यात आली.

32 इस्साखाराच्या घराण्यातील दोनशे जाणती व जबाबदार माणसे आली. इस्राएलने केव्हा काय करणे योग्य आहे हे समजण्याचे त्यांना चांगले ज्ञान होते. त्यांचे भाऊबंद त्यांच्या आज्ञेत होते. 33 जबुलून घराण्यातले पन्नास हजार अनुभवी सैनिक तयार होते. सर्व शस्त्रे ते कुशलतेने हाताळू शकत. दावीदाशी ते एकनिष्ठ होते.

34 नफतालीच्या घराण्यातून एक हजार सरदार आले. त्यांच्याबरोबर ढाली आणि भाले बाळगणारे सदतीस हजार लोक होते. 35 दानच्या वंशातून अठ्ठावीस हजार जण युध्दाला तयार होते.

36 आशेर वंशातून चाळीस हजार सैनिक युध्दावर जायला तयार असे होते. 37 यार्देन नदीच्या पूर्वेकडील रऊबेनी, गादी आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशातील एक लाख वीस हजार लोक सर्व प्रकारच्या हत्यारांसह सज्ज होते.

38 हे सर्वजण पराक्रमी होते. दावीदाला इस्राएलाचा राजा करायचे याबाबतीत इतर इस्राएल लोकांची एकवाक्यता होती. म्हणूनच ते हेब्रोन येथे एकत्र आले. इस्राएलमधील इतर लोकांचीही दावीदाने राजा व्हावे हीच इच्छा होती. 39 त्यांनी तेथे दावीदाबरोबर तीन दिवस घालवले. खाण्याचा व पिण्यांचा आस्वाद त्यांनी घेतला, कारण त्यांच्या नातलगांनी त्याच्याबरोबर सर्व अन्नपुरवठा देऊन पाठवले होते. 40 याखेरीज इस्साखार, जबुलून, नफताली अशा आसपासच्या भागात राहणाऱ्यांनी गाढव, उंट, खेचरे, व गाई बैल यांच्या पाठीवर लादून अनेक खाद्यपदार्थ आणले. कणीक, अंजीराच्या ढेपा, मनुकांचे घोस, द्राक्षरस, तेल, गाई बैल व मेंढरे असे बरेच काही आणले. कारण इस्राएलमध्ये उत्सव चालला होता.

<- 1 इतिहास 111 इतिहास 13 ->